छोट्या विद्यार्थ्यांनीही सादर केले आकर्षक मॉडेल
सिल्लोड, (प्रतिनिधी): तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोलेगाव बु. येथे नुकतेच विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन गट शिक्षणाधिकारी रमेश ठाकूर, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजीव फुसे तसेच पानवडोद केंद्राचे केंद्रप्रमुख जे.आर. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक शेख सादिक व नामदेवराव साखळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेच्या परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षक अजीम देशमुख, पंजाबराव देशमुख, शेख अजहर, मुसद्दीक शेख, सय्यद लुबना, बुशरा सुलताना, सिद्दीकी नुजहत आलिया, शबाना इनामदार, सारिका नागे, शारदा कुमकर, सुरेखा थोरात, दिपाली गालम यांच्यासह इतर शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रदर्शनामध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत विविध वैज्ञानिक मॉडेल सादर केले.
विशेष म्हणजे इयत्ता पहिली व दुसरीतील लहान विद्यार्थ्यांनीही विज्ञान प्रदर्शनात उत्साहाने सहभाग घेतला, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एवढ्या लहान विद्यार्थ्यांनी तयार केलेले वनस्पतींची वाढ, स्वच्छता, सौरऊर्जा व पाणी संवर्धन यांसारखे सोपे वैज्ञानिक मॉडेल पाहून पालकांनी त्यांचे कौतुक केले. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी जलचक्र, पावसाची प्रक्रिया व पर्यावरण संरक्षण यासंदर्भातील मॉडेल सादर केले.
तसेच इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी सौरमाला, पाणी शुद्धीकरण यंत्र व पवनऊर्जे द्वारे वीज निर्मिती यांसारखे मॉडेल तयार केले. इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी ज्वालामुखी उद्रेक, पावसाचे पाणी साठवण, स्मार्ट सिटी व प्रदूषण नियंत्रण यांसारखी आकर्षक व उपयुक्त मॉडेल सादर करून आपली वैज्ञानिक समज दर्शवली.
प्रदर्शनाला उपस्थित असलेल्या पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करत सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होतो. त्यांनी शिक्षकांच्या प्रयत्नांचेही कौतुक करत शाळेत विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न ठेवता प्रयोगात्मक व सर्जनशील शिक्षण दिले जात असल्याचे नमूद केले. पालकांनी असेही सांगितले की, अशा प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते. शेवटी शाळा परिवाराने उपस्थित पालक व ग्रामस्थांचे आभार मानले.












